वारी २०२५

Lord Vitthal

वर्ष दुसरे होते म्हणून वारीचा दिवस कसा जाईल हे अगदीच ठाऊक होते. मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षीही 'आयटी दिंडी' म्हणजेच या वर्षीपासून 'एआय दिंडी’ या संस्थेसोबतच जाण्याचे ठरवले. माझा मित्र तुषार खास मुंबईहुन वारीसाठी येणार होता. सकाळी ५ ला आवरून आम्ही आमच्या 'पिकअप पॉईंट' ला पोचायला आणि आमची बस यायला एकच मुहूर्त. तिथून मगरपट्टातील डेस्टिनेशन सेंटरला नाष्ट्यासाठी पोचायचे होते. सोबत प्रवासात आम्हाला आमच्या गर्दीतील एक खुण म्हणून गांधी टोपी व पाण्याची बाटली मिळाली. "रक्षण्या सिंदुर 'वार'करी शुर" हे टोपीवरील वाक्य मनाला वेगळाच पीळ देऊन गेलं. मुळात मला आम्ही वारकरी आहोत असं एकदिवसासाठी म्हणून घेणं अजिबात पटत नाही. पुणे ते सासवड अलीकडील पंचवटी हॉटेल इथपर्यंतचा आमचा प्रवास. १८–२० कि.मी इतकाच. जी मंडळी १७ दिवसांचा अवघड पायी प्रवास करतात, उपास-तापास करतात, मिळेल तिथे, मिळेल तेवढंच खाऊन, कधी तंबूत तर कधी एखाद्या मेडिकलच्या गाळ्याबाहेर रात्रकाढूण, विठ्ठला प्रति उदंड भक्तीभाव राखत वारी पूर्ण करतात ते वारकरी. सर्वात महत्वाचा असलेला हा 'उदंड भक्तिभाव' काय असतो हेच आमच्या अतिशहाण्या बुद्धीला ठाऊक नाही, त्यामुळे तो बाळगणे म्हणजे नेमकं काय हे माहित नसणे ही शोकांतिकाच. "वारकरी", मोठा आणि खोल शब्द. आम्ही सनस्क्रीन लावलेले हौशी प्रेक्षक.

मला तर एका सच्या वारकऱ्याचा हेवा वाटतो. किती सहजरित्या ते कुणाएका विठ्ठल नामक संस्थेला शरण जातात. कुठलाही प्रश्न किंवा शंका- कुशंका करत न बसता. असो...
आपल्या पिढीला कोणतीही गोष्ट उगाच, चालत आलेली गोष्ट म्हणून किंवा कुणीतरी सांगितलं आहे म्हणून करणे कधीच जमलेलं नाही.  त्यामुळे साहजिकच वारीला का जायचं हा महत्वाचा प्राथमिक प्रश्न आलाच. प्रथेबद्दल थोडं वाचन केलं तेव्हा ही परंपरा भारतवर्षाच्या शेकडोवर्षांच्या खडतर कालखंडातून अविरतपणे कशी जोपासली गेली ह्याची प्रचीती झाली. खडतर हा शब्द खुपच अपुरा पडतो. फ़क्त औरंगजेबाच्या ५० वर्षाच्या कार्यकाळात लाखो मंदिर माझ्या देशात तोडली गेली, मुर्त्या फोडल्या गेल्या त्यात पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, यवत नजीकील भुलेश्वर मंदिर ही तर फारच थोडकी उदाहरणं. पण दर वेळेला ही मंदिरं पुन्हा उभी राहिली. काफिरांची दुर्दम्य श्रद्धाच दुसरं काय. 

पण लाखो लोक शेकडो वर्ष करतायत म्हणून वारीला जाणं हे पचणारं नव्हतं. कुठली वेगळीच धार्मिक ओढ वाटतीय असही नाही. माझ्यासाठी वारी हा एक वेगळाच महाराष्ट्र बघण्याची संधी होती, पुणे- मुंबई पल्याडचा. ही सुद्धा माझीच लोकं आहेत हे जाण्याचा. कुठलंही आमिष न दाखवता, फक्त समर्पक भक्तिभावाच्या ताकदीवर लाखो लोक एकत्र येणं म्हणजे काय हे अनुभवण्याचा. कुठेही गोंधळ, घाई गडबड, भांडण अजिबात बघायला मिळालं नाही.


इतका मोठा प्रवास, १७ दिवसांचा, त्यात मधे–मधे पाऊस पडतोय, मध्येच प्रचंड ऊन, पण तरी कोणी फुगडी घालत चाललंय, कोणी मृदंगाच्या तालात पुर्णपणे दंगून नाचतंय तर कोण मोठ्याने अभंग म्हणत स्वतःच्या दिंडीचा आत्मविश्वास वाढवतंय. पायात साधी चप्पल तीसुद्धा घातलीतर घातली, गळ्या भोवती पंचा त्यावरून टाळ, काही बायकांच्या डोक्यावर तुळस तर 
काहींच्या बॅगा, पुरुषांच्या खांद्यावर झेंडूचा हार घातलेला भगवा झेंडा व सोबत एकाबाजूला अडकवलेली चेन नसलेली कपड्याची व इतर महत्वाच्या सामानाची बॅग.


वारकऱ्यांच्या उजवीकडून त्यांच्या इतक्याच गतीने दिंडींच्या ट्रक, ट्रॅक्टर–ट्रोलीची देखील रांग पुढे सरकत होती. दिंडीतील अगदीच वृद्ध मंडळी त्यातुन प्रवास करत होती. ट्रकमध्ये त्यांच्या अवती–भवती जेवणाची सामग्री ,मोठेली पातेली, शेगडी, पाण्याच्या टाक्या, झोपण्यासाठी लागणाऱ्या चटई –सतरंज्या व इतर सामान ठेवलेले होते. ट्रकच्या बाहेरील बाजूने बायकांनी ओल्या साड्या वाळायला टाकल्या होत्या. असा एकुण सगळा लवाजमा वळणदार दिवे घाटातून जाताना बघणं सनातन संस्कृतीचं जिवंतपणाचे प्रतीकच होय.

वारीभर पुढाऱ्यांचे स्वागतोत्सुक फ्लेक्स आणि मंडप, स्थानिक सेवाभावी संस्थांचे फराळ–पाण्याचे स्टॉल, वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणीसाठीचे व पायाच्या मसाजचे स्टॉल पहायला मिळाले. या सर्वांमधून संथ गतीने लोकांचा  प्रवाह अविरत सुरू होता अगदी रात्री ८ पर्यंत, जवळ-जवळ १०–१२ तास. हा संपूर्णवेळ पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. वारीत २०–४० या वयोगटातील लोकांचा सहभाग देखील लक्षणीय होता.  आम्ही २ च्या सुमारास नियोजित ठिकाणी पोहोचलो. जेवण करून एक डुलकी घेतली कारण पालखी गेल्याशिवाय रस्ता खुला नव्हता होणार. तोपर्यंत आमच्या परतीच्या बस घाट चढुन वर नव्हत्या येऊ शकणार. ६ वाजल्या पासून बाहेर येऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची वाट बघत बसलो. नजीकच एक सिमेंटसारखा पदार्थ असलेला डंपर उभा होता. ड्रायव्हरची परवानगी घेत वर पाय टाकून बसलो. त्या ठिकाणाहून संपूर्ण रस्ता चाळता येत होता. तिथे बसून माझा व तुषारचा सगळ्यात मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला, तो म्हणजे जवळच्या मंडपातून हरवलेल्या लोकांसाठी केलेल्या त्यांच्या आप्तेष्टांच्या विनवण्या ऐकणं. "अमुक अमुक हरवले आहेत त्यांनी माईकशी संपर्क साधायचाय." इतक्या घोषणा केल्यावर, मागच्यावर्षी एका कार्यकर्त्यानी कंटाळून एकच घोषणा केली, " समद्यांनी छा प्या अन् सासवडला जाऊन एकमेकांना शोधा." खुप हसलो होतो तेव्हा.

नंतर, नेहमी प्रमाणे ८ च्या सुमारास मुक्ताई पालखी आली व मागोमाग महाराजांच्या पालखीचा रथ. ओढायला दोन लांब शिंग असलेली देखणी बैलं, शिंगावर मोरपीस. चोही बाजूंनी फुलांच्या माळा, दोन्ही बाजूंना वरती कमळाच्या आकाराचे फुलांचे ठेंगणे मनोरे, समोर व मागच्या बाजूला हॅलोजन लाईट व आत मध्ये १०–१५ विश्वस्थ मंडळी. रथात पालखी, पालखीत पादुका व आजुबाजूला लोकांचा दर्शनासाठी कल्लोळ. जवळ जाऊन दर्शन घेण्याची इच्छा व धाडस दोन्ही नव्हतं.

एकंदरीतच वारी ही मनाला नमवण्याची व संस्कृती अनुभवायची एक दिव्य संधीच. प्रत्येक हिंदुने (धर्माने नव्हे!), सनातन संस्कृतीच्या पाईक असलेल्याने एकदा तरी वारीचा अनुभव आवर्जून घ्यावा.


राम कृष्ण हरी